विमानतळ विस्तार विरोधी लढ्यासाठी तयार राहा

डॉ. भारत पाटणकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

तीन गावचे शेतकरी होणार भूमिहीन

विमानतळ विस्तारीकरणामध्ये वारुंजी, मुंढे व केसे या तीन गावांचा समावेश आहे. या तिन्ही गावातील मिळून सुमारे 268 शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत. त्याचबरोबर 500 ते 600 शेतकरी अंशत: बाधित होणार आहेत. या भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारने काय विचार केला आहे का? यापुढे येणाऱ्या अडीअडचणींबाबत काय उपाययोजना केलेल्या आहेत? यासारखे प्रश्‍न बाधित शेतकऱ्यांसमोर आ वासून उभे आहेत. 

कराड – विमानतळ विस्तारीकरण करण्याच्या शासनाच्या एक कलमी कार्यक्रमामुळे तुम्ही उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कराड विमानतळ विस्तारवाढीची प्रक्रिया बेकायदेशीर आहे. तरीही शासनाने भूसंपादन झाल्याचे सांगत थेट पैसे घेऊन जावा, अशाच नोटिसा काढल्या आहेत. आपआपसातील मतभेद, राजकारण बाजूला ठेवून विमातळ विस्तारवाढीच्या अंतिम लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
वारुंजी, ता. कराड येथील विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, शिवाजीराव शिंदे, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून विमानतळ विस्तारीकरणाला ठोस कायदेशीर पद्धतीने विरोध केला आहे. शासनाने सर्व कायदे मोडत ही विस्तारवाढ वारुंजी, मुंढे, केसे गावातील शेतकरी व राहत्या घरे बाधित होणाऱ्यांवर लादली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शासनाला अशा पध्दतीने ही विस्तारवाढ करता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांना 2015 रोजी तसा पत्रव्यवहार केला आहे.

गेल्या चार पाच वर्षात हे प्रकरण शांतच होते. मात्र विधानसभेत ही भानगड कोणी उकरून काढली, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. डॉ. पाटणकर म्हणाले, भुसंपादन कायद्याचे उल्लंघन, पर्याय दिला असतानाही याच जागेवर विमानतळ करण्याचा हट्टाहास कोणासाठी व कशासाठी, संयुक्त मोजणी झालीच नाही तर भुसंपादन कसे निश्‍चित केले? हाही कळीचा मुद्दा आहे. कृती समितीने सुचवलेला पर्याय योग्य असेल तर तेथेच विमानतळ करा अन्यथा तुमच्या दारात येऊन बसणार, असा इशारा देत विमानतळ विस्तारवाढीच्या अंतिम लढाईला सर्वांनीच सज्ज व्हायला पाहिजे. आता विमातळ रद्द झाल्याशिवाय घरी येणे नाही, अशी घोषणा डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली.

तसेच कराड विमानतळ विस्तारीकरणात तुम्ही उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपण लढणार आहोत की नाही? का फक्त राजकीय खुसपट काढणार? असाही संतप्त सवाल करत डॉ. भारत पाटणकर म्हणाले, मी आमक्‍याचा, मी तमक्‍याचा मी आमच्या बापाचा नाहीच..! हा घाणेरडा नाद सोडा. जोपर्यंत विमानतळ विस्तारवाढ रद्द होत नाही, तोपर्यत तुम्ही विमानतळ विस्तार रद्द पार्टीचेच असे निवडणुकीत मताची भिक मागायला येणाऱ्यांना सांगा, असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले. पंजाबराव पाटील म्हणाले, कोणीही ऐरा गेरा येतो आणि निवेदने देतो. एवढा दर मिळणार होता, तेवढा दर मिळणार होता असे सांगतो. मग त्यांचा मुख्यमंत्री असताना दर द्यायला काय अडचण होती. ही फक्त सर्वसामान्य नागरिकांची उघडउघड दिशाभूल करण्याचा प्रकार केला जात असल्याचे सांगत पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्यावर नाव न घेता थेट टीका केली.

भैरवनाथ पाणी योजना आहे, म्हणून तीन गावचा शेतकरी आहे. या योजनेसाठी तीन गावच्या लोकांनी कोणकोणत्या अडचणींचा सामना केला आहे. सध्या फक्त आपण ऊसाचा दर पाहतोय. मात्र योजना वाचली तर आपण वाचणार याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असेही आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले आहे. या मेळाव्यास वारुंजी, केसे, मुंढे गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.