कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहा 

पाकिस्तानी पंतप्रधानांचे लष्कर व जनतेला आवाहन

इस्लामाबाद  – पाकिस्तानातील जनता आणि लष्कर या दोघांनीही आता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची सिद्धता ठेवावी असे आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्या देशाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक झाली त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातर्फे एका निवेदनाद्वारे हे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की भारताने पाकिस्तानवर अनावश्‍यक अतिक्रमण केले आहे. त्याला पाकिस्तान उत्तर देईल. पण त्याचे ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू. या स्थितीत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि जनतेने आता सिद्ध राहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

आज सकाळीच पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात या हल्ल्यानंतर उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हे निवेदन जारी करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी आपली प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानवर केलेले हे गंभीर आक्रमण आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेचे त्यांनी उल्लंघन केले असून त्याला प्रत्युत्तर देण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत. स्वसंरक्षणासाठी हे प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.