कोल्हापूर – मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन यंदाही करोना रुग्णांसाठी तयारी ठेवावी. महानगरपालिका, आयजीएम, सीपीआर आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय यंत्रणा पूर्ण क्षमतेने उपचारासाठी कार्यान्वित करावी, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
करोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व पदाधिकारी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, महापालिकेने आपली यंत्रणा सक्रीय करुन मागील वर्षाप्रमाणे कोविड आरोग्य केंद्र सुरु करावीत. हॉटेल चालकांशी चर्चा करुन यावर्षीही रुग्णांसाठी सुविधा देण्यासाठी तयारी करावी. फायर ऑडीटनुसार सीपीआरमध्ये तत्काळ दुरुस्ती करावी. कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शासन निर्देशाप्रमाणे औद्योगिक आणि व्यापारी घटकांतील व्यक्तींची तपासणी करुन निगेटिव्ह अहवालानंतर त्यांचे लसीकरण केले जाईल. त्यासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येतील. तसेच रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनासाठी महानगरपालिका, नगरपालिकाआणि ग्रामीण भागात तीन शिफ्टमध्ये संपर्क अधिकारी नेमण्यात येतील. ते रुग्णांचा प्रवेश आणि डिस्चार्ज याबाबत मॉनिटरींग करतील. तपासणी वाढवण्यावरही भर द्यावा. गृह अलगीकरणाबाबत तपासणी करुनही त्यावर मॉनिटरींग करावे, असे त्यांनी सांगितले.