पुणे – गणेशोत्सव उत्सव लवकरच सुरू होत आहे. आपण दरवर्षी हा उत्सव अत्यंत हर्षोल्हासाने साजरा करतो. याही वर्षी तो असाच साजरा करायचा आहे; परंतु काही खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे, असे मत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी आमचे बोलणे सुरू आहे. गर्दी कमी कशी करता येईल, किंवा एकाच वेळी गर्दी न करता टप्प्या टप्प्याने लोक आले तर तशी सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय मूर्ती विक्री करतानाही, स्टॉल लावताना, खर्दी करताना गर्दी होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर असेल त्याचा वापर केला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागणार आहेत, असे विक्रम कुमार म्हणाले.
तसेच सगळ्या मंडळांना आमची विनंती, आवाहन राहील की आपण उत्सव साजरा करताना यावर्षी राज्य सरकारचे जे निर्देश आले आहेत ज्यामध्ये गणेशमूर्तींची उंची किती असली पाहिजे, मंडप किती मोठे असावेत किंवा गर्दी कशी कमी करावी वगैरे या विषयावर नक्की लक्ष द्या, अशा सूचनाही विक्रम कुमार यांनी केल्या आहेत.
करोना मोठ्याप्रमाणात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेला आहे. विशेषत्त्वाने वयोवृद्ध लोकांमध्ये म्हणजे जे 60-65 वयाच्या पुढील आहेत. त्यांच्यामध्ये करोनाची लागण वेगाने होत आहे. त्यांना माझी सूचना राहील की, आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, माझ्यापेक्षा जास्त जग पाहिले आहे. आपण आपली खूप खबरदारी घ्या. मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा, सॅनिटायझरचा वापर करा. कमीतकमी बाहेर पडता येईल त्यावर आपण लक्ष द्या, असेही विक्रम कुमार म्हणाले.