चार महिन्यांत 9 हजार ज्येष्ठांना लागण ः 11 हजार मुले बाधित
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत वृद्ध व लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर लागण होत आहे. संसर्ग पसरविण्यासाठी तरुणमंडळी सर्वाधिक कारणीभूत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी विविध कारणांनी बाहेर जाऊन करोना घेऊन घरी परतत आहेत.
भाजी, औषधी किंवा किराणा वगैरे घेण्याचे सोडून इतर कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी तरुणमंडळी सहजरित्या घराबाहेर पडत आहेत. मागील वर्षी ज्याप्रमाणे लोकांच्या मनामध्ये भीती होती तशी न राहिल्याने सर्वाधिक तरुण बाहेर पडत आहेत.
शहरात लॉकडाऊन सुुरू असले तरी विविध कारणे देत ते घराबाहेर पडत आहेत. बाहेरून घरात करोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन ज्येष्ठ नागरिकांना व बालकांना हसत-खेळत करोनाची भेट देत आहेत. तरुणांमध्ये करोनाची लक्षणे सौम्य दिसत असली तरी त्यांच्याकडून लागण झालेल्या ज्येष्ठांमध्ये तीव्र आहेत.
शहरात 1 जानेवारीपासून आजपर्यंत 91 वर्षांवरील 82 जणांना लागण झाली आहे. तर 60 वर्षांवरील 9 हजार 603 ज्येष्ठांना करोनाने गाठले आहे. तसेच लहान मुलांनाही लागण झाली आहे. 10 वर्षांखालील 4,299 बाळांना लागण झाली आहे. ते 11 ते 20 वर्ष वयोगटातील 6967 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, तरुण सर्वाधिक बाधित झाले आहेत. 21 ते 40 वर्ष वयोगटातील 47 हजार 995 जणांना करोनाची लागण झाली आहे.