पुणे – हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळे शहरात पुन्हा स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मागील आठ दिवसांत या वाढत्या संसर्गामुळे 5 रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर दोघांवर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाला बांधून घराबाहेर पडावे. सर्दी, ताप, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे अवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
उन्हाचा वाढत्या तडाक्याने शहरात ठाण मांडून बसलेला स्वाइन फ्लू मागील काही दिवसांपासून गायब झाला असे वाटत होते. मात्र, थंडी, ताप किंवा अन्य कारणांमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर येत आल्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव अजूनही सुरूच असल्याचे दिसून येते. दरम्यान, एप्रिलच्या सुरूवातीला स्वाइन फ्लूची लागण झालेले 25 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. अवघ्या चार महिन्यांत तब्बल 129 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली तर 4 हजार 532 संशयीत व्यक्तींना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला.
दरम्यान, एप्रिलमधील तापमानाने गाठलेला उच्चांकामुळे स्वाइन फ्लू गायब झाला होता. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून अतिदक्षता विभागातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता व्यक्त करणारी आहे. बुधवारी (दि. 15) दिवसभरात 3 हजार 560 व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. तर 40 जणांना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले.