सावधान…सायबर भामट्यांचे जाळे विस्तारतेय!

घटना वाढल्या : क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती देणे धोकादायक

पुणे – क्रेडिट-डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन, विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून, फंडाची रक्कम खात्यात जमा करण्याचे सांगत तसेच क्‍लोन एटीएम कार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अनेकांची आयुष्यभर कमावलेली पुंजी काही सेकंदात सायबर भामटे काढून घेत आहेत. असेच प्रकार वारंवार घडत असून असे व्यवहार धोक्‍याचे ठरत आहेत.

ज्येष्ठ नागरिकास 38 हजारांचा गंडा
रिवार्ड पॉईंट मिळवून देण्याच्या आमिषाने 67 वर्षीय नागरिकाची 37 हजार 668 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोबाइल धारकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सदाशिव पेठेत रहातात. त्यांना एका मोबाइलधारकाने कॉल करुन “बॅंकेच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट 9 हजार 500 रुपये रोख स्वरुपात करुन देतो’ असे आमिष दाखवले. यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे दोघांच्याही बॅंक खात्यातून प्रत्येकी 18 हजार 969 आणि 18 हजार 699 रुपये काढून घेतले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक म्हस्के करत आहेत.

बनावट खाते उघडून 90 हजारांची फसवणूक
बॅंकेत बनावट खाते उघडून एकाची 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संदीप कुलकर्णी (34,रा.वडगाव-शेरी) यांच्या नवी पेठ येथील राहत्या घरातून त्यांचे छायाचित्र आणि कागदपत्रे घेऊन बॅंकेत खाते उघडण्यात आले होते. यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यावरुन 90 हजार 334 रुपये ऑनलाइनद्वारे वर्ग करुन फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलगुटकर करत आहेत.

9 लाखांच्या नादात गमावले 1 कोटी 68 लाख रु.
सासऱ्याची 9 लाख रुपयांची फंडाची रक्कम मिळवण्याच्या नादात एका महिलेने 1 कोटी 68 लाख 11 हजार रुपयांची रक्कम गमावली. याप्रकरणी विविध संस्था व मोबाइल धारक महिलांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात बुधवार पेठेतील 50 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही रक्‍कम 2013 पासून आजवर देण्यात आली होती. फिर्यादी महिलेस 2013 मध्ये एका कंपनीतून कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने “तुमच्या सासऱ्याचा 9 लाख रुपयांचा फंड असून त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची’ असल्याचे सांगितले. यासाठी पॉलिसी आणि एनओसी काढून, इन्कम टॅक्‍सही भरावयास लागेल असे पटवून दिले. यानंतर त्यांच्याकडून विविध कारणे सांगून रोख, सोन्याच्या स्वरुपात तसेच आरटीजीएसव्दारे 1 कोटी 68 लाख 11 हजार 619 रुपये लाटण्यात आले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या खात्यातून आरोपींच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. त्यांनी दोन ते तीन खात्यांमध्ये हे पैसे वर्ग केल्याचे दिसत आहे. तर त्यांना वेगवेगळी नावे घेऊन 12 मोबाइल नंबरवरुन कॉल आले होते. गुन्ह्यात एकूण 34 जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक यश सूर्यवंशी करत आहेत.

नागरिकांनो, काळजी घ्या…
बॅंकांचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. तसेच बॅंकांकडून एटीएम व डेबिट कार्ड देण्यात येते. मात्र, ते वापरायचे कसे व काय खबरदारी घ्यायची? याबद्दल जागृती केली जात नाही. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असतानाही उच्चशिक्षित व्यक्तीही सहज सायबर भामट्यांवर विश्‍वास ठेऊन बॅंक खात्यासंदर्भात गोपनीय माहिती देत आहेत. यामुळे अनेक सावज सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडत आहेत. मागील काही बॅंकासंदर्भातील सायबर गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.