नवी दिल्ली : करोनाने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा धडकी भरावली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वांचेच टेन्शन वाढत आहे. अनेक प्रगत देशात करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान जगभरात संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. करोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट इतका घातक असून लसही त्याच्यासमोर कुचकामी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जगभरातील करोनाग्रस्तांच्या संख्येने 21 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 217,901,675 वर पोहोचली आहे. तर 4,523,766 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच या नवीन व्हेरिएन्टने टेन्शन वाढवले आहे. करोना लस घेतल्यावरही मोठा धोका असल्याचा खुलासा रिसर्चमधून करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. या विषाणूच्या व्हेरिएंटला C.1.2 असे नाव देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात सर्वप्रथम हा व्हेरिएंट पाहण्यात आला. त्यानंतर आता नवा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. C.1 च्या तुलनेत नवा व्हेरिएंट म्यूटेट आहे. रिसर्चमध्ये दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत C.1 व्हेरिएंट आढलून आला होता. तो आता म्युटेट होऊन C.1.2 झाला आहे. आफ्रिकेत गेल्या वर्षी आढळून आलेले व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटच्या नावाने ओळखले जात होते. मात्र नंतर जागतिक आरोग्य संघटनेने यांच नामकरण केले आहे.