न्यूयॉर्क : जगात सर्वात जास्त फटका बसलेल्या अमेरिकेने काही दिवसापूर्वी नागरिकांना मास्क घालण्यापासून मुक्ती दिली होती. मात्र याच अमेरिका प्रशासनाने आता पुन्हा एकदा नागरिकांना मास्क संबंधी नवीन आदेश जारी केले आहेत.अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
जगाला हैराण करून सोडणाऱ्या करोना विषाणूंमध्ये सातत्याने बदल होत असून डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. माहितीनुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
“संसर्गाचे प्रमाण जास्त तसेच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असे त्यांनी सांगितले . सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.
सीडीसीने आपल्या संशोधनात दावा केला आहे, लस घेतलेले नागरिक जेव्हा संक्रमित होतात तेव्हा त्यांचा व्हायरल लोड लस न घेणाऱ्यांइतकाच असतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, या संशोधनानंतर असे म्हटले जाऊ शकते की लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिकही इतरांना संक्रमित करु शकतात.
सीडीसीने मे महिन्यात लस घेतलेल्या लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तसंच रुग्णालयात जाताना मास्कचा वापर करा असे सीडीसीने सांगितले होते. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये ६० हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली असून पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेला आहे.