‘रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी काळजी घ्या’

त्रिसूत्रीचा वापर व्हावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे – पुणे जिल्ह्यामध्ये करोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. दैनंदिन अहवाल पाहता रुग्ण संख्या व मृत्यू कमी झाल्याचे दिसून येते. परंतु, युरोप, दिल्ली, केरळ या ठिकाणी पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आवश्‍यक काळजी न घेतल्यास पुण्यातही अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात लस उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा सातत्याने वापर करणे आवश्‍यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सांगितले.

जिल्ह्यात करोनाचा प्रथम रुग्ण मार्चमध्ये आढळल्यापासून आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने अहोरात्र काम करत आहे. त्यात शासकीय व खासगी दोन्ही क्षेत्रात हे काम सुरू आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत दैनंदिन सर्वेक्षण, संपर्क शोध, किरकोळ आजार ते गंभीर आजारी रुग्णांचे अति दक्षता विभागातील व्यवस्थापन इत्यादी कार्य सातत्याने सुरू आहे.

या प्रक्रियेमध्ये आरोग्य यंत्रणेतील अनेकांना करोनाची लागण झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले. तरीही माघार न घेता आरोग्य यंत्रणेतील आपले कोविड योद्धे करोना प्रतिबंधाचे कार्य करत आहेत. या पुढेही हे कार्य असेच सुरु राहणार आहे, असा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.