मुंबई – करोना महामारीचा वेग कमी होताच आता गोवरचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई मध्ये गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गोवर आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, ही साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही गोवर करोनापेक्षा पाचपट वेगाने पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लहान मुलांमध्ये तो अधिक वेगाने पसरण्याची भीती तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. मात्र, असे असले तरी गोवरचा फैलाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरणाचे आता चांगले परिणाम दिसत असून रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच येणाऱ्या पुढील १० ते १५ दिवस रुग्णसंख्येत उतार कसा होतो, हे पाहून संसर्ग नियंत्रणात आहे का, हे ठरवण्यात येईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी नुकतंच सांगितले आहे.
सध्या मुंबईमध्ये अतिरिक्त मात्रांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून, नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १४ आरोग्य केंद्रांतील एकूण ३,५६९ बालकांना ही गोवर रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे रुग्णालयांतील ओपीडीमध्ये बुधवारी ३६ रुग्णांना दाखल करण्यात असून, त्यामधील ३० रुग्णांना घरी सोडण्यात आले. शहरात २,२९,९०४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ताप व पुरळ असलेल्या ९२ रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ही लक्षणे असलेले एकूण ४,२७२ रुग्ण आढळून आली आहे. एका पप्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, गोवर या आजाराला मराठीत गोवर, गोवरी, किंवा हिंदीमध्ये चेचक, छोटी माता तर इंग्रजमध्ये मीझल्स किंवा रुबिओला या नावाने ओळखतात. ताप व अंगावर उठणारे पुरळ ही गोवरची सर्वांना माहित असणारी ओळख आहे. मात्र, या आजराची सर्वाधिक लागण ही लहान मुलांमध्ये होताना दिसून येत आहे.