आजकाल बहुतेक लोक इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग वापरत आहेत तसेच यूपीआय देखील मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. मात्र, जसजसे लोकांचे काम सोपे होत आहे तसतसे हॅकर्ससाठी तुमच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे अधिक दरवाजे उघडत आहेत.
इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईलमधील धोके काही कमी नाहीत. अशी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत की इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून बऱ्याचजणांचे पैसे गायब झाले आहेत. आजकाल लोकांची अनेक प्रकारे फसवणूक होत आहे.
बऱ्याच वेळा सायबर फसवणूक करून बँकेच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक केली जाते आणि कधीकधी ओटीपी फसवणूक होत असते. त्यामुळे, हे जाणून घेणे खूप गरजेचे झाले आहे की, इंटरनेट बँकिंग दरम्यान कोणती खबरदारी घ्यावी?
१. ओटीपी फसवणूक
पहिली गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की जोपर्यंत तुम्ही व्यवहार करत नाही तोपर्यंत तुमच्या फोन नंबरवर ओटीपी (OTP) येणार नाही आणि जर तुम्हाला व्यवहाराचा ओटीपी मिळाला नाही तर तुम्ही सतर्क रहा. जर असे झाले तर याचा अर्थ असा की सायबर ठगांकडे तुमच्या बँकेबद्दल आधीच बरीच माहिती आहे. अशी फसवणूक टाळण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर वगैरेची माहिती तुमच्या बँकेला वेळोवेळी देत राहा. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर लगेच बँकेला कळवा. तसेच, आठवड्यातून एकदा तरी तुमच्या क्रेडिट कार्ड खात्याचा तपशील तपासा.
२. कोणतीही लिंक उघडू नका
तुमच्या फोन नंबरवर किंवा ई-मेल आयडीवर काही संशयास्पद लिंक आल्यास त्यावर क्लिक करण्याची चूक करू नका. समजा चुकून क्लिक झाल्यास कोणताही ऑनलाईन फॉर्म भरू नका. या पद्धतीला ‘फिशिंग अटॅक’ असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे, लोकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती जसे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, इंटरनेट बँकिंग आयडी अशी माहिती मिळवली जाते.
३. गुंतागुंतीचे पासवर्ड वापरा
इंटरनेट बँकिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक खात्यासाठी गुंतागुंतीचे पासवर्ड वापरा आणि वेळोवेळी पासवर्ड बदला जेणेकरून कोणालाही याबद्दल माहिती आली तरी तुम्ही सुरक्षित असाल. पासवर्डमध्ये वाढदिवस, लग्नाची तारीख, मोबाईल नंबर किंवा वाहन क्रमांक वापरू नका.
४. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांना कळवा
सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुमची फसवणूक झाली असेल तर ताबडतोब सायबर पोलीस, स्थानिक पोलीस आणि बँकेला कळवा. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितकेच तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमच्या फोनमध्ये पेड अँटी व्हायरस वापरा. सुरक्षिततेच्या दृष्टीने विनामूल्य अँटीव्हायरस चांगले नाहीत.