सावधान! मराठवाड्यात ‘डेल्टा प्लस’चा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

बीड: राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे तीव्र पडसाद मराठवाड्यात पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासन उपाययोजना करत आहे. असे असतानाच  आता बीड जिल्ह्यातही डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आल्याने प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागे झाले आहे.

करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 45 रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळून आले आहेत. त्यातच औरंगाबाद पाठोपाठ आता बीडमध्येही रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या चार तालुक्यात कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 200 हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे हा आकडा चिंताजनक आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा जो रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरु आहे. जनुकीय कर्मनिर्धारण सर्वेक्षणातून रुग्ण शोधला असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, नाशिक पाठोपाठ मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.एकूण रुग्ण संख्या ही 45 वर पोहोचली आहे. राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

मुंबई ठाणे रत्नागिरी, औरंगाबाद येथे रुग्ण वाढ दिसते. डेल्टा प्लस रुग्ण वाढ झाली तरी घाबरण्याचे कारण नाही, पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले. मात्र, रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन देखील टोपेंनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.