कोलंबो – चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनावर इतक्यात नियंत्रण मिळवता येईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये. अशातच आता कोरोना विषाणूबाबतची टेन्शन वाढवणारी नवी माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीलंकेमध्ये या महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून एका अभ्यासानुसार दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूचा प्रसार हा पहिल्यापेक्षा अधिक वेगाने होतोय. मार्च महिन्याच्या मध्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत श्रीलंकेमधील बाधितांचे प्रमाण अत्यल्प राहिले होते. ऑक्टोबर ४ ला दुसरी लाट येण्यापूर्वी तेथे कोरोनाचे केवळ ३३९६ रुग्ण आढळले होते तर १३ जणांचा मृत्यू झाला होता.
मात्र दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. आजच्या (शनिवार) आकडेवारीनुसार श्रीलंकेतील एकूण बाधितांच्या संख्येने १० हजारांचा आकडा पार केला असून आतापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, श्रीलंकेतील श्री जयवर्धनेपुरा विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूतील जनुकीय बदलांचा अभ्यास केला असता दुसऱ्या लाटेतील विषाणू हा वेगळ्या प्रकारचा असल्याचं आढळलं आहे. याबाबत माहिती देताना, डॉ. चंडीमा जीवनंदरा यांनी, “देशात यापूर्वी सापडलेला कोरोना विषाणू हा बी .१, बी .२, बी १.१ आणि बी.४ प्रकारातील होता. मात्र सध्या सापडत असलेल्या विषाणूचा प्रकार हा बी १.४२ असा आहे.” अशी माहिती दिली.
असं असलं तरी प्रशासनातर्फे पुन्हा एकदा देशव्यापी लॉक डाऊन करण्याची कोणतीही योजना अद्याप आखण्यात आलेली नाही. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून ऑक्टोबर ४ पासून श्रीलंकेतील १५० पोलीस विभागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या वाढीचा वेग मंदावल्याने चित्र दिसत आहे. मात्र यामुळे गाफील न राहता जोपर्यंत ठोस उपचार मिळत नाहीत तोपर्यंत कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे असे मत जगातील आरोग्य विषयक जाणकारांनी नोंदवले आहे.