“होम क्वारंटाइन’ करोना बाधितांसाठी पालिकेचा निर्णय
पुणे – करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांवर त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही अनेक बाधित घराबाहेर पडून करोनाचा प्रसार करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन “होम क्वारंटाइन’ अर्थात गृह विलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडल्याचे आढळल्यास त्याच्याकडून तब्बल 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून, पुढील लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरातील एकूण बाधितांमध्ये 65 टक्के जण सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात आहेत. त्यांची संख्या सध्या 35 हजारांपर्यंत आहे. यातील अनेक बाधित राजरोसपणे फिरत आहेत. तसेच करोना झाल्याची माहिती लपवून ते संसर्ग पसरवत आहेत.
याबाबत गेल्या काही दिवसांत महापालिकेकडे तक्रारी आल्या असून प्रामुख्याने हे रुग्ण मोठ्या सोसायट्या तसेच स्वतंत्र इमारतीतील आहेत. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेकडून मोबाइलवरील जीपीएस लोकेशन ट्रेस केले जाते. मात्र, हे रुग्ण फोन बंद करून अथवा फोन एका खोलीत ठेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे, अशा बाधितांना आवर घालण्यासाठी महापालिकेने कडक उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉंड लिहून घेणार
करोना बाधित व्यक्ती जर, गृह विलगीकरणात राहणार असेल, तर त्याच्याकडून 25 हजारांचा बॉंड लिहून घेतला जाईल. गृहविलगीकरणाचे नियम न पाळल्यास या बॉंडच्या आधारे त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. रुग्ण घरी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमली जातील. ही पथके दिवसभरात केव्हाही रुग्ण घरात आहे का, याची पाहणी करतील. असे रूग्ण घराबाहेर जाणार नाहीत, यासाठी संबधित सोसायटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाण्याची शक्यता आहे. जेव्हापासून हा निर्णय लागू होईल, त्या दिवसापासून पुढे गृह विलगीकरणाच्या रुग्णांना हा नियम लागू असेल.
गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी नियमांची अंमलबजवाणी करणे आवश्यक आहे. सामाजिक जबाबदारीचे भानही या रुग्णांनी जपणे आवश्यक आहे. मात्र, काही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे कडक उपाययोजना करण्यात येणार असून, त्या अंतर्गत 25 हजार रुपयांचा बॉंड लिहून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त