खबरदार, करोना उपचारांचे जादा बिल आकाराल तर

विभागीय आयुक्‍तांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

पुणे – करोनाग्रस्तांवर उपचार करणारी खासगी रुग्णालये जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर आता नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांचाही समावेश आहे. जर रुग्णालयाने जादा दर आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.

डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्य आरोग्य सचिवांशी चर्चा करून ही समिती स्थापली आहे. जर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश मान्य नसतील, तर विभागीय आयुक्तांकडे रुग्णालयाला दाद मागता येणार आहे.’
जिल्हाधिकारी राम म्हणाले, “रुग्णालयाकडे पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देत नाहीत. बिल कमी करा, अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी तक्रारी येत होत्या. आता करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरीब नागरिकांकडून जादा दर आकारण्यात येऊ नये, गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. खासगी रुग्णालयांवर नियंत्रण यामुळे राहणार आहे. सर्वच रुग्णालये जादा दर आकारतात. राज्य शासनाने यापूर्वीच करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे दर ठरविले आहे. त्यानुसार रुग्णालयांनी दर आकारणे आवश्‍यक आहे.’

रुग्णालयामध्ये नर्सिंग स्टाफ उपलब्ध नाही. कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटलमधील काही भाग देतो. यातून उपचार करणे सोयीस्कर होईल. बाहेरगावच्या नर्सिंग स्टाफला पुण्यात येण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी रुग्णालयांनी केली आहे. रुग्णालयांना आवश्‍यकतेनुसार नर्सिंग स्टाफ आणि डॉक्‍टर उपलब्ध करून देण्यात येतील.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.