राजगुरूनगर – खेड तालुक्यात करोना उद्रेक दिवसेंदिवस वाढल्याने तालुका “रेड अलर्ट’मध्ये आला आहे. 24 तासांत 128 करोनाबाधित आढळून आले. वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील अर्थचक्र घसरताना दिसत आहे. शहरांसह ग्रामीण भागात गावेच्या गावे आता पुन्हा करोनाच्या विळख्यात आली आहेत
चाकण, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत सुरु असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांची (दि. 26) अँटीजेन चाचणीशोध मोहिमेतून 399 जणांमधून 79 जण बाधित आहे. 79 पैकी 74 जणांना महाळुंगे इंगळे येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 5 जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
शुक्रवारी चाकण (35), राजगुरूनगर (28), आळंदी (3) तिनही नगरपरिषद हद्दीत एकूण 66 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. ग्रामीण भागातील 28 गावांमध्ये 62जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
आतापर्यंत 488 सुपस्प्रेडर बाधित आढळले
खेड तालुक्यातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या गावातील सुपर स्प्रेडर असणाऱ्यांची अँटीजेन चाचणी सुरू आहे.आतापर्यंतच्या 7 टप्यातील अँटीजेन चाचणीत 4 हजार 343 पैकी तब्बल 488 जणांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्याने सर्वाचेच धाबे दणणणले आहे. आठवडाभरात हे करोनाबाधित सर्वत्र फिरत दैनंदिन व्यवहार करीत असल्यामुळे आता आजून किती बाधित सापडणार या विचाराने नागरिकांसह प्रशासन हादरले आहे.