चार टोळ्यांचे 70 सदस्य शहरभर विखुरलेले
डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
मुंबईतील प्रकरणांच्या तपासासाठी पथक येणार पुण्यात
आरोपी मूळचे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे
पुणे – जवळपास 50 जणांना गंडा घालून दिल्ली व गाझियाबादचे ठग आता पुण्यात आले आहेत. त्यांनी आजवर चौघांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यांच्या चार टोळ्यांमध्ये महिलांसह 70 सदस्य आहेत. अतिशय “स्मार्ट’पणे ते सावज हेरत आहेत. यामुळे पुणेकरांनी स्वस्तात मिळणाऱ्या डॉलरच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मूळचे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे हे ठग गाझियबाद आणि दिल्ली येथे कार्यरत होते. मागील काही महिन्यांपासून त्यांनी शिवाजीनगर, खडकी, हडपसर आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावज हेरुन त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. यातील एका टोळीला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
स्मार्ट वर्क आणि झटपट पैसा
यातील प्रत्येक टोळीत 10 ते 15 सदस्य आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अतिशय स्मार्ट पद्धतीने ते आपले सावज हेरत असतात. व्यावसायिक, दुकानदार किंवा श्रीमंत व्यक्तीशी संपर्क साधून ते त्याला विश्वासात घेतात. डॉलर असल्याचे त्याला दाखवत असा मोठा साठा असून 70 रुपयांचा अमेरिकन डॉलर अवघ्या 30 रुपयांना देण्याचे आमिष दाखवले जाते. एका डॉलरमागे 40 रुपयांचा फायदा लक्षात घेता सावज जाळ्यात सापडते. समोरच्या व्यक्तीकडून रोकड मिळाल्यावर त्याला रुमाल गुंडाळलेला अमेरिकन डॉलरचा बंडल सोपवले जाते. मात्र, या बंडलात वरती ओरिजनल नोट असते, तर खाली सर्व झेरॉक्स असतात. सावजाला कळेपर्यंत टोळी फरार होते.
ठगांचीही चार स्तरावर सुरक्षा व्यवस्था
सावज हेरल्यावर हे ठग त्याच्याकडून पैसे घेताना पोलीस कारवाईची शक्यता लक्षात घेऊन चार स्तरावर स्वत:ची सुरक्षा व्यवस्था उभारतात. या टोळीचे सदस्य अर्धा किलोमीटर परिसरात विखुरलेले असतात. पैसे घेऊन येणाऱ्यास झोपडपट्टी परिसरात बोलावले जाते. तेथेही दोन ते तीन वेळा ठिकाण बदलले जाते. पैसे घेताना प्रत्यक्षात दोन ते तीन जणच समोर येतात. इतर काही सदस्य तेथून थोड्या अंतरावर दगाफटका होऊ नये म्हणून थांबतात. तर उरलेले सदस्य गल्ली-बोळांतून येणाऱ्या रस्त्यावर पोलीस किंवा कोणी संशयास्पद व्यक्ती येत आहेत का, यावर लक्ष ठेऊन असतात. संशय वाटल्यास ते त्यांचा प्लॅन बदलतात. यामुळे आजवर शहरात मागील वर्षभरात दाखल झालेल्या तीन ते चार घटनांमध्ये ठगांचा माग पोलिसांना लागला नव्हता.
नागरिकांना ठगवून मिळालेल्या पैशांतून ऐषोआराम आणि मौजमजा केली जाते. तर काही जणांनी या पैशांतून त्यांच्या मूळ गावी बंगले बांधल्याची माहिती मिळत आहेत. यातील गॅंगचा म्होरक्या ठगवलेल्या पैशांतील 50 टक्के हिस्सा घेतो, तर सावज हेरणाऱ्यास 30 टक्के हिस्सा दिला जातो. यानंतर प्रत्यक्षात फिल्डवर मदत करणाऱ्यांस 20 टक्के हिस्सा दिला जातो. मिळालेले सर्व पैसे मौजमजेसाठी वापरले जात असल्याने त्यांच्याकडून पैसे परत मिळविणे अवघड असते. फरासखाना पोलिसांनी पकडलेल्या टोळीने दिल्लीत आजवर 50 जणांना फसवल्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही असे प्रकार घडले असून मुंबई पोलिसांचे एक पथक तपासासाठी पुण्यात दाखल होणार आहे.
अमेरिकन डॉलर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चार टोळ्या शहरात कार्यरत आहेत. नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. असा प्रकार लक्षात आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा
– सुहास बावचे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -1.