नवी दिल्ली (प्रतिनिधी) – करोनावरील औषधोपचारातून निर्माण झालेल्या काळ्या बुरशीचे सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आढळून आले असल्याची माहिती आज आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक 6339, तर गुजरातमध्ये 5486 प्रकरणे आढळून आली आहेत.
कोविड-19 वर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्र्यांच्या गटाची आज 28 वी बैठक आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न झाली. या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय आवास आणि शहर विकासमंत्री हरदीप पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात काळी बुरशीचे (म्युकरमायकोसिस) 28 हजार 252 केसेस आढळून आल्या आहेत. यातील 86 टक्के अर्थात 24 हजार 370 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर, 17 हजार 601 रुग्णांना मधुमेहाचा आजार होता.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 61 दिवसांत काल दि. 6 जून रोजी सर्वात कमी एक लाख 636 नवीन प्रकरणे आळढून आले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्के आहे.
काळ्या बुरशीचे सर्वाधिक 6339 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर गुजरातमध्ये 5486 केसेस सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार, 7 जूनच्या सकाळपर्यंत संपूर्ण देशात 36 कोटी 63 लाख 34 हजार 111 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. ही चाचणी दोन हजार 624 प्रयोगशाळांमध्ये केली गेली.
टेस्टनंतर असे दिसून आले की, करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. दिल्लीत संसर्गाचा दर हा अर्ध्या टक्क्यांहूनही कमी झाला आहे. तर, 15 राज्यांमध्ये अजूनही संक्रमण 10 टक्क्यांच्या आसपास आहे.