जुन्नर : जुन्नर तालुक्यात शनिवारी (दि. 15 ) तब्बल 20 करोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापैकी 9 रुग्णांचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 580 झाली आहे.
नव्याने नारायणगाव (3), विठ्ठलवाडी (2), रोहकडी (2) तर बुचकेवाडी, परिटवाडी, राजुरी, काळवाडी, राळेगण, ओतूर, सावरगाव, अमरापूर, मंगरूळ, बल्लाळवाडी, खानगाव, गोळेगाव आणि जुन्नर शहरात प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यांपैकी 462 व्यक्ती उपचारानंतर घरी परतले आहेत तर उर्वरित 91 ॲक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान नारायणगाव येथे एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील एकूण बळींची संख्या 27 झाली आहे.
नागरिकांची जबाबदारी वाढली
शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये काहीशी शिथिलता दिल्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिकच वाढल्याचे लेण्याद्री सेंटरचे प्रमुख डॉ. शाम बनकर यांनी सांगितले आहे. तालुक्यात करोनामुळे मृत झालेल्या 27 व्यक्तींपैकी बहुतांश व्यक्ती 50-55 वयोगटाच्या पुढील असून त्यांना इतरही आजार असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे घरातील जी तरूण व्यक्ती बाहेर फिरत असते तिने घरात आल्यावर वयस्कर व्यक्तींपासून दूर रहावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी केले आहे. तसेच घरातील वयस्कर व इतर आजार असलेल्या व्यक्तींना घरातच वेगळ्या खोलीत क्वारंटाईन केल्यास वयस्कर व्यक्तींमधील वाढती बधितांची संख्या कमी होणार असल्याचे डॉ. गोडे यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्वांनी मास्क व सॅनेटायझरचा वापर कटाक्षाने करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.