सतर्क रहा फिटनेसविषयी… 

फिट राहण्यासाठी काय खावे, किती खावे, कोणता व्यायाम करावा, तो किती वेळासाठी करावा, विश्रांती कधी आणि किती वेळ घ्यावी, या सर्वच गोष्टींच्या बाबतीत अनेकांकडून अनेक सल्ले आपल्या कानावर सतत पडत असतात, पण या सल्ल्यांचा स्वीकार करून आपले फिटनेस रुटीन बनविण्याअगोदर फिटनेसविषयी आपल्या मनातून काही गैरसमज दूर करणेही आवश्‍यक आहे.
जिममध्ये व्यायाम करीत असताना अनेक व्यक्ती आपल्या रुटीनची सुरुवात ट्रेडमिलवर धावून करताना दिसतात. सर्वात आधी कार्डियो-वर्कआउट करण्याकडे यांचा कल असतो, पण यामुळे शरीरातील ग्लायकोजेनची पातळी कमी होऊन, त्यानंतर वेट ट्रेनिंग करणे कठीण होऊ शकते.

त्यामुळे आपल्या रुटीनची सुरुवात वेट ट्रेनिंग, म्हणजेच वजने उचलण्याने करावी. यामुळे शरीरातील कोर्टीसोन आणि टेस्टोस्टेरोनची पातळी वाढून याचा फायदा आपल्या वर्कआउटमध्ये होत असतो. अनेकांच्या मते सकाळी केलेला व्यायाम हा शरीरासाठी उत्तम असतो अशी एक समजूत असते, पण यामध्ये फारसे तथ्य नाही. व्यायाम दिवसातून कोणत्या वेळेला केला जावा यापेक्षा तो नियमित, दररोज केला जावा याला अधिक महत्त्व आहे, असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे व्यायाम सकाळी करायचा असो वा संध्याकाळी, शरीरासाठी तो तितकाच फायदेशीर ठरतो.

व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराला हलक्‍या वॉर्म अपची आवश्‍यकता असते. अशा वेळी हृदयाच्या ठोक्‍यांची गती हलकीशी वाढेल असे व्यायाम प्रकार वॉर्म अप म्हणून करणे योग्य असते. अनेक जण वॉर्म अपसोबत अनेक स्ट्रेचिंगचे व्यायामही करीत असतात, पण यावेळी स्ट्रेचिंग मात्र फार करणे योग्य नाही. कारण व्यायाम करण्यापूर्वी जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंवर अतिरिक्त ताण येऊन, त्यांना इजा पोहोचण्याची शक्‍यता 30 टक्‍क्‍यांनी वाढते. स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार मुख्यतः आपल्या व्यायामाच्या रुटीनच्या शेवटी, आपल्या शरीरातील स्नायू शिथिल करण्याकरिता करावेत.

त्याचप्रमाणे जितका जास्त घाम गळेल, तितके वजन झपाट्याने कमी होईल असा आणखी एक गैरसमज सर्रास पाहायला मिळतो. याच गैरसमजापायी अनेक जण केवळ कार्डियो व्यायाम करूनच घाम गाळीत असताना पाहायला मिळतात. मात्र, वजन घटविण्यासाठी कार्डियो आणि वेट ट्रेनिंग हे दोन्ही प्रकार आवश्‍यक आहेत. वेट ट्रेनिंगमुळे शरीरातील स्नायूंचे टोनिंग होऊन त्यांना बळकटी मिळते, तसेच यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यासही मदत मिळते.

तसेच व्यायाम केल्यावर शरीरामध्ये वेदना जितकी जास्त होईल, तितके चांगले अशाही प्रकारचा गैरसमज काहींच्या मनामध्ये असतो. सवय नसताना एकदम व्यायाम सुरू केल्याने स्नायूंमध्ये थोडीफार वेदना निर्माण होणे सामान्य असले, तरी ही वेदना प्रमाणाबाहेर वाढणे, व्यायाम चुकीच्या पद्धतीने करीत असल्याचे, किंवा स्नायूंना इजा झाल्याचे निदर्शक असू शकते. त्यामुळे ही वेदना जास्त काळाकरिता त्रस्त करीत राहिली, तर त्यासाठी त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.

नियमित व्यायाम केल्यास शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात. एका दिवसाला किती व्यायाम करतो यापेक्षा नियमितपणे व्यायाम करणं आवश्‍यक आहे. कारण रोजची दगदग, धावपळ, उठ-बस करून व्यायाम होतोच, असा बहुतेकांचा गैरसमज असतो. ही क्रिया करून तुमच्या शरीराची हालचाल होते. यात काहीच शंका नाही, पण व्यायाम हा योग्य पद्धतीने करणं आवश्‍यक आहे. आता उन्हे वाढत असल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. म्हणून व्यायाम करताना मधूनमधून थोडं पाणी प्यावं.

दररोज सहा ते सात लिटर पाणी प्यावं. व्यायाम करताना शरीर हलकं आणि मन शांत असणं आवश्‍यक आहे. त्यावेळी शरीर थकलेलं नसावं तसंच कोणताही त्रास किंवा दुखणं नसावं. असे असल्यास व्यायाम करणं टाळावं, पण त्यातील काही जण रोग दूर करण्यासाठी करत असतील तर तो योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. व्यायामासाठी जागा शांत, स्वच्छ, हवेशीर तसंच मनास प्रयत्न वाटेल अशी असावी. व्यायाम काही न खाता-पिता करावा. कोणतंही पेय किंवा खाल्ले असल्यास किमान अर्धा तास तरी जाऊ द्यावा. जेवणाच्या आधी दोन तास आणि नंतर चार तासांनी व्यायाम करावा. व्यायाम करताना घट्ट कपडे घालू नयेत. स्वच्छ, सैलसर कपडे घालावेत. विशिष्ट प्रकारच्या व्याधीग्रस्त व्यक्तींनी शक्‍यतो व्यायाम डॉक्‍टरच्या सल्ल्यानेच करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.