BCCI & Domestic cricket : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी एक नवीन आदेश आला आहे. बोर्डाने टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय संघातील खेळाडू जेव्हाही मोकळे असतील तेव्हा त्यांना देशांतर्गत क्रिकेटसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, यामध्ये तीन खेळाडूंना सूट मिळाली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की, जेव्हा राष्ट्रीय संघातील खेळाडू देशासाठी खेळणार नाहीत, तेव्हा त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये कसोटी संघातील खेळाडूंनी किमान एक सामना खेळावा अशी बोर्डाची इच्छा आहे. भारताला ऑगस्टमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत दुलीप ट्रॉफीसाठी खेळाडू तयार होतील.
या 3 खेळाडूंना मिळाली सूट..
बीसीसीआयचा हा निर्णय रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना लागू होणार नाही. वास्तविक, बोर्डाने या तीन खेळाडूंना सूट दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायचे की नाही हे स्वत: ठरवावे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. याचा स्पष्ट अर्थ बोर्ड या तिन्ही खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही.
टीम इंडियाचे सिलेक्टर दुलीप ट्रॉफीसाठी निवडतील खेळाडू…
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, यावेळी केवळ टीम इंडियाचे सिलेक्टर्स (निवडकर्ता) दुलीप ट्रॉफीसाठी खेळाडूंची निवड करतील. वास्तविक, दुलीप ट्रॉफीसाठी प्रादेशिक निवड समिती नाही. यामध्ये सर्व कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाईल. मात्र, रोहित, कोहली आणि बुमराह यांना यामध्ये खेळायचे की नाही हे ते स्वत: ठरवतील. गेल्या वर्षी बीसीसीआयने केवळ श्रेयस अय्यर आणि इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते.