आयपीएलसाठी बीसीसीआयचे पाकसमोर लोटांगण
मुंबई – आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी पाकिस्तान सुपर लीग स्पर्घा रद्द करून त्या जागी आशिया करंडक खेळवा व सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा कालावधी आयपीएलसाठी सोडा अशी विनंती करत बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट मंडळासमोर चक्क लोटांगण घातले आहे. 5 हजार कोटींचा तोटा होऊ नये यासाठी बीसीसीआयने ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया, हीच म्हण सार्थ ठरवली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची नियुक्ती झाल्यानंतर रॉयल बेंगॉल टायगरच्या थाटात पाक मंडळाच्या अनेक योजनांना बीसीसीआयने विरोधाची डरकाळी फोडली होती, आता याच वाघाची शेळी झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबरमध्ये होत असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलसाठी ही विंडो मिळावी यासाठी फिल्डिंग लावली आहे. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तान सुपर लीग घेण्यात येणार, असे जाहीर केले तसेच आशिया करंडक स्पर्धादेखील खेळवली जाईल, असे स्पष्ट केल्याने बीसीसीआयसमोर काजवे चमकले.
हजारो कोटींचा फटका बसण्याच्या भीतीपोटी त्यांनी पाक मंडळाकडे आर्जव केली आहे. पाकिस्तान सुपर लीग लांबणीवर टाकून आशिया करंडक खेळवा व सप्टेंबर आणि ऑक्टोबरची विंडो आयपीएलसाठी खुली ठेवण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती बीसीसीआयने केली आहे. आशिया करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला असले तरीही दोन्ही देशांतील तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा श्रीलंका किंवा अमिरातीत होण्याचे संकेत पाक मंडळाने दिले होते. करोनाचा धोका असताना आशिया करंडक स्पर्धा खेळविणे शक्य होणार नसल्याचे मत बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. मात्र, आता पाक मंडळाकडे विनंती केल्यानंतर बीसीसीआयने पाक मंडळासमोर नांगी टाकल्याचे स्पष्ट होत आहे. यावर पाक मंडळ काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाक मंडळाने मागितली लेखी हमी ..
भारतात पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक होणार आहे, तसेच 2023 साली एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक होणार आहे. या दोन्ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताचा व्हिसा मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे हा व्हिसा बिनदिक्कत मिळेल, अशी हमी बीसीसीआयने द्यावी, अशी मागणी पाक मंडळाने आयसीसीकडे केली आहे. यावरून असे स्पष्ट होत आहे की, या हमीच्या बदल्यात पाक मंडळ बीसीसीआयची विनंती मान्य करून आयपीएलच्या आयोजनाला सहकार्य करेल.