नवी दिल्ली : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यागओदर बीसीसीआयने तातडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशू कोटक यांची गुरुवारी टीम इंडियाचे फलंदाजीचे कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
इंग्लंड विरुद्ध होणारी टी-20 आणि वनडे मालिका तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी बोर्डाने तातडीने हा निर्णय घेतला. 52 वर्षीय कोटक हे अनेक वर्षापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजीचे कोच आहेत. ते सिनिअर आणि ए टीम सोबत अनेक वेळा परदेशी दौऱ्यावर गेले आहेत. कोटक मोठ्या कालावधीपासून कोच आहेत आणि खेळाडूंचा त्यांच्यावर विश्वास आहे.
कोटक यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 15 शतकांसह 8 हजारहून अधिक धावा केल्या आहेत.भारताच्या सहाय्यक स्टाफमध्ये गोलंदाजीचे कोच म्हणून मोर्ने मार्केल, नेदरलँडचे रियान टेन डोइश हे फिल्डिंग कोच आहेत. भारतीय संघ 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. त्यामुळे आता सितांशू कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.