नवी दिल्ली :- दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेला अंतिम स्वरूप देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरुवात केली असून महिला आयपीएलचा पहिला हंगाम पुढील वर्षी मार्चमध्ये खेळला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांच्या आयपीएल लीगसाठी 2023 च्या मार्च महिन्याला पसंती मिळत असून यासाठी बीसीसीआयने वेळापत्रकही बदलले आहे.
दरम्यान, ‘बीसीसीआय’च्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत 9 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा संपल्यावर लगेच महिलांची आयपीएल खेळवली जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.