नवी दिल्ली – बीसीसीआयने आयसीसी आयोजित विश्वकरंडक व जागतिक स्पर्धा अशा आगामी तीन स्पर्धांच्या आयोजनाची तयारी दर्शवली असून, त्याचा प्रस्तावही पाठवला आहे. आयसीसीच्या 2024 ते 2031 या कालावधीत आठ वर्षांच्या आराखड्यातील दोन विश्वकरंडकांसह तीन जागतिक स्पर्धांसाठी बीसीसीआयने दावेदारी केली आहे.
बीसीसीआयच्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने 2025 सालची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, 2028 सालची टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आणि 2031 साली होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दर्शवली आहे. 2017 सालानंतर प्रथमच चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करणार असल्याचे आयसीसीने यापूर्वीच जाहीर केले होते. या स्पर्धेचे यजमानपदही मिळवण्यासाठी बीसीसीआय तयारी करत आहे.
रणजी स्पर्धेची नुकसानभरपाई
करोनाच्या धोक्यामुळे गेल्या वर्षी आयोजित होऊ न शकलेल्या रणजी करंडक क्रिकेट
स्पर्धेची नुकसानभरपाई खेळाडूंना दिली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने 10 सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.
ऑलिम्पिकसाठी 10 कोटी
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय क्रीडापटूंच्या तयारीसाठी बीसीसीआयने 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे
ठरवले आहे.