बीसीसीआयचे अधिकारी तिवारी यांचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली – करोना महामारीचा मोठा फटका जगासह क्रिकेट विश्‍वालाही बसत आहे. या महामारीमुळे गेल्या वर्षापासून क्रिकेटचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तसेच यंदाची आयपीएल स्पर्धादेखील अचानक स्थगित करावी लागली. काही क्रिकेटपटूंनाही यापूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यातच भारतीय क्रिकेटसाठी आयुष्य वेचणारे बीसीसीआयचे अधिकारी कृष्णकुमार तिवारी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

तिवारी यांच्यावर झज्जरमधील एम्स हॉस्पिटलममध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती शनिवारी अचानक खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. दिल्ली क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, तिवारी हे गेल्या तीन दशकांपासून दिल्ली क्रिकेटमध्ये स्कोरर होते. त्यांनी चार कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि 60 रणजी मॅच कव्हर केल्या आहेत. त्याचबरोबर ते 50 आयपीएल मॅचचे देखील स्कोरर होते. तसेच त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 1985 सालापासून पंच म्हणून काम केले आहे. दिल्ली क्रिकेटचा ज्ञानकोश म्हणून ते ओळखले जात. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.