BCCI New Rules For Cricketer: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याआधी मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने कठोर नियमांचे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. तसेच, सर्व खेळाडूंना आता हे नियम पाळणे बंधनकारक आहे. जे खेळाडू हे नियम मोडतील, त्यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते.
बीसीसीआयने खेळाडूंसाठी लागू केले 10 नियम
- देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक – भारतीय संघातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळत असल्याचे समोर आले होते. मात्र, आता सर्वच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागेल. या आधारावरच भारतीय संघातही खेळाडूंची निवड केली जाईल. काही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट खेळू शकत नसल्यास त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.
- कुटुंबासोबत प्रवास करता येणार नाही –दौऱ्यावर असताना खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासह प्रवास करता येणार नाही. प्रत्येक खेळाडूला संघासोबतच प्रवास करावा लागेल. कुटुंबासोबत वेगळा प्रवास करायचा असल्यास त्यासाठीही परवनागी घ्यावी लागेल.
- सामानाची मर्यादा – खेळाडूंना दौऱ्यावर अतिरिक्त सामान घेऊन जाता येणार नाही. परदेशातील 30 दिवसांपेक्षा अधिक, 30 दिवसांपेक्षा कमी आणि देशांतर्गत स्पर्धेनुसार सामानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खेळाडू व सपोर्ट स्टाफ दोन्हीसाठी हे नियम लागू असतील.
- सेंटर ऑफ एक्सिलेंस बंगळुरू येथे वेगळे सामान पाठवणे – बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सिलेंस येथे सामान किंवा वैयक्तिक वस्तू पाठवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागेल. स्वतः वस्तू पाठवल्यास अतिरिक्त खर्च खेळाडूला करावा लागेल.
- खासगी कर्मचाऱ्यांवर बंदी – कोणत्याही दौऱ्यावर खासगी कर्मचारी जसे की वैयक्तिक मॅनेजर, शेफ, सहाय्यक आणि सुरक्षारक्षक यावर बंदी असेल. यासाठीही बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल.
- प्रॅक्टिस सेशन – प्रत्येक खेळाडूला प्रॅक्टिस सेशनला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सराव सोडून लवकर जाता येणार नाही. स्पर्धेदरम्यान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरावासाठी जाताना संघासोबतच जावे लागेल.
- स्पर्धेदरम्यान शूटिंगवर बंदी- दौऱ्यादरम्यान खेळाडूंना यापुढे वैयक्तिक शूट अथवा जाहिरातींचे शूटिंग करण्याची परवानगी नसेल. खेळाडूंनी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत घालवता येणार कमी वेळ- परदेश दौरा 45 दिवसांपेक्षा अधिक असल्यास एका सीरिजदरम्यान खेळाडूंना 2 आठवड्यांच्या टप्प्याने एकदा कुटुंबाला भेटता येईल. कुटुंबाचा खर्च देखील खेळाडूंनाच करावा लागेल. तसेच, कुटुंबाला भेटण्यासाठी कोच किंवा कर्णधाराकडून परवानगी घ्यावी लागेल.
- अधिकृत शूटिंग व कार्यक्रमात सहभाग – बीसीसीआयचे अधिकृत शूट, प्रमोशन आणि इतर कोणतेही कार्यक्रम असल्यास प्रत्येक खेळाडूला त्यात सहभागी होणे अनिवार्य असेल.
- दौरा संपताच होताच घरी जाता येणार नाही– प्रत्येक खेळाडूला दौरा संपेपर्यंत संघासोबतच राहावे लागणार आहे. स्पर्धा लवकर संपली तरीही खेळाडूला संघासोबत राहावे लागेल.
दरम्यान, सर्व खेळाडूंनी या नियमांचे पालन करावे, असे बीसीसआयने म्हटले आहे. तसेच, कोणत्याही नियमात सूट हवी असल्यास त्यासाठी खेळाडूंना आधी परवानगी घ्यावी लागेल. जे खेळाडू याचे पालन करणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.