नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेसाठी प्रक्षेपण हक्कांची पुन्हा एकदा विक्री केली जाणार असून यावेळी आगामी पाच वर्षांसाठी देण्यात येत असलेल्या प्रक्षेपण हक्कांच्या करारातून बीसीसीआयला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 5 अब्ज डॉलर्सची कमाई होणार आहे.
आगामी दहा वर्षांसाठीच्या (2023 ते 2033) प्रक्षेपण हक्कांद्वारे (टीव्ही आणि डिजिटल) बीसीसीआयला ही कमाई करता येऊ शकते. आत्ता आयपीएल स्पर्धेचा करार स्टार इंडियाकडे असून हा करार 2022 साली संपुष्टात येणार आहे.
त्यानंतर या हक्कांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्टार इंडियाकडे सध्याचे हक्क असून त्यातून बीसीसीआयला 16 हजार 347.50 कोटी रुपये मिळत आहेत.
पुढील मोसमात आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होत आहेत. त्यामुळे स्पर्धेचे दिवस वाढणार असून सामन्यांची संख्याही वाढणार आहे. सामन्यांची संख्या 74 होणार आहे. त्यामुळे प्रक्षेपण हक्काद्वारे पाच अब्ज डॉलर (36 हजार कोटी रुपये) बीसीसीआयला मिळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रक्षेपण हक्क शर्यतीत परदेशी प्रक्षेपण कंपनीनेही उत्सुकता दर्शवली आहे. मागील प्रक्षेपण हक्काच्या शर्यतीत स्टार इंडिया आणि सोनी हे दोनच मोठे स्पर्धक होते.