BCCI : …मग विश्रांती का घेतली नाही

विराट कोहलीवर बीसीसीआयची आगपाखड

मुंबई – भारतीय संघ सातत्याने खेळत असून त्यांना विश्रांतीच मिळत नाही. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळवली गेली नसती तर खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळाली असती, अशी टीका भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केली होती. त्यावर बीसीसीआयने आगपाखड केली आहे. जर विश्रांती हवी होती, तर एकदिवसीय मालिकेतून माघार का घेतली नाहीस, तुझ्यावर कोणी ही मालिका खेळण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती, अशा शब्दांत बीसीसीआयने कोहलीला फटकारले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर टीका थेट माध्यमांशी बोलताना केली होती. खेळाडूंना सर्व सामने खेळण्याची जबरदस्ती बीसीसीआय करत नाही. कोहलीला जर विश्रांती हवी होती तर त्याने तसेच सांगायला हवे होते. बीसीसीआयने त्याला ही परवानगी दिली असती, असे मत बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्‍त केले आहे.

भविष्यात वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या विश्रांतीचा विचार करायला हवा. बायोबबलमध्ये बराच काळ राहिल्यानंतर खेळाडूंच्या मानसिकतेत बदल होतो. या वातावरणात राहण्याचा आता माझ्यासह सगळ्याच खेळाडूंना कंटाळा आला आहे, असे कोहली म्हणाला होता.

भारतीय संघातील खेळाडूंवर सगळेच सामने खेळले पाहिजेत, अशी जबरदस्ती केली जात नाही. सध्या संघाचा सेकंड बेंच भक्कम आहे, त्यामुळे संघाकडे खूप पर्याय आहेत. अशा स्थितीत ज्या खेळाडूंना विश्रांती हवी असेल त्यांनी बीसीसीआयशी संवाद साधला पाहिजे असे थेट माध्यमांशी बोलू नये, असेही बीसीसीआयने कोहलीला सुनावले आहे.

करोनाच्या धोक्‍यात आगामी स्पर्धा व मालिकांचे वेळापत्रक तयार करण्याचेच आमचे काम आहे. मात्र, जर एखाद्या खेळाडूला त्यातून ब्रेक हवा असेल तर त्याला दिला जातो. खुद्द कोहलीलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विश्रांती दिली गेली होती. खेळाडूंची दुसरी फळी असताना एखाद्याला विश्रांतीची गरज असेल, तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.

कोहली व महंमद शमी यांना विश्रांती दिली गेली होती. त्यांच्या जागी नवोदित खेळाडूंना संधी दिली गेली होती. तसेच रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्‍विन व हनुमा विहारी यांना दुखापतीने काही सामने खेळता आले नव्हते, त्यांच्या जागी सेकंड बेंचमधील खेळडूंना खेळवले गेले होते. सामन्यांच्या वेळापत्रकावर टीका करणारा कोहलीच नव्हे तर सगळेच खेळाडू आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका करतील का, असा सवालही बीसीसीआयने केला आहे.

विश्रांतीचा निर्णय खेळाडूंनीच घ्यावा

भारतीय संघातील खेळाडूंनीच त्यांच्या विश्रांतीबाबत निर्णय घ्यावा. त्यांना जर आपण सातत्याने खेळत आहोत व काही काळ ब्रेकची गरज आहे, असे वाटत असेल तर त्यांनी निवड समिती, मुख्य प्रशिक्षक तसेच बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.