नवी दिल्ली – केंद्र सरकारने बीसीसीआयला यंदाच्या मोसमात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसह अन्य क्रिकेट सत्रात ड्रोन वापरण्याची परवानगी दिली आहे.
बीसीसीआय एरियल सिनेमॅटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी बीसीसीआयला सशर्त परवानगी दिली आहे. बीसीसीआय व मेसर्स क्विडिकडून हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाला विनंती करण्यात आली होती.
या वर्षी एप्रिलपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा ड्रोनद्वारे आयोजित केली जाणारी पहिली स्पर्धा ठरेल. बीसीसीआयला देण्यात आलेली परवानगी 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. या काळात ड्रोनचा वापर सर्व अटी व नियमांचे पालन करून करावा लागणार आहे. जर यापैकी एखाद्या नियमांचे उल्लंघन केले तर ही परवानगी रद्द केलीजाऊ शकते.
ड्रोनचा वापर करण्याआधी बीसीसीआयला स्थानिक प्रशासन, संरक्षण आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक हवाई नियंत्रण कक्षाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. ड्रोनद्वारे केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडिओचा वापर फक्त आणि फक्त बीसीसीआयद्वारेच केला जाईल असे देखील महटले आहे.