IPL 2025 Timetable : काही महिन्यांपूर्वीच आयपीएल 2025 चे मेगा ऑक्शन पार पडले. तेव्हापासूनच यंदाचा आयपीएल सीझन कधी सुरू होणार, अशी विचारणा चाहत्यांकडून केली जात होती. अखेर IPL 2025 च्या सीझनची तारीख समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या सीझनच्या तारखेची घोषणा केली आहे.
या वर्षी आयपीएलचा थरार 23 मार्चपासून रंगणार असल्याची माहिती राजीव शुक्ला यांनी दिली आहे. हा आयपीएलचा 18वा सीझन असेल. राजीव शुक्ला यांनी आयपीएल कधी सुरू होणार याची माहिती दिली असली तरी प्लेऑफ किंवा अंतिम तारखेबद्दल काहीही सांगितलेले नाही. आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक अद्याप बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेले नाही.
बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलच्या तारखेबाबत निर्णय घेण्यात आला. सोबतच, या बैठकीत देवजीत सैकिया यांची बीसीसीआयचे नवे सचिव आणिप्रभातेज सिंग भाटिया यांची बीसीसीआय कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याआधीचा सीझन 22 मार्च 2024 ला सुरू झाला होता. तर 26 मे ला रंगलेल्या अंतिम सामन्यात कोलकत्ता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले होते.
दरम्यान, 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. त्याआधी 12 जानेवारीपर्यंत भारतीय संघाची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, आता 18-19 जानेवारीला होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली जाऊ शकते.