मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जे खेळाडू भारतीय संघाकडून खेळले आहेत व त्यातील जे खेळाडू पुढील महिन्यापासून सुरु होत असलेल्या आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळणार आहेत, त्यांना बायोबबल टू बायोबबल ट्रान्सफरची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे पुण्यात होत असलेली एकदिवसीय सामन्यांची मालिका संपुष्टात आल्यावर संबंधित खेळाडू आपल्या संघाच्या सराव सत्रात त्वरित सहभागी होऊ शकतात, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत खेळत असलेले व आयपीएलमध्येही सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेपूर्वी विलगीकरणात राहण्याची गरज नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे हे खेळाडू विलगीकरणात न राहता आयपीएलच्या बायो-बबलमध्ये राहू शकतात.
भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेत खेळत असलेले खेळाडू थेट आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, स्पर्धेतील संघांना आपल्या खेळाडूंना हॉटेल, प्रवास तसेच अन्य सर्व बाबी पुरवणे सक्तीचे करण्यात आले आहे. खेळाडूंनी कोरोना नियमांच्या प्रोटोकॉलचे योग्य पालन केल्याचे आढळले तर ते खेळाडू आरटीपीसीआर चाचणी आणि विलगीकरणाच्या नियमाशिवाय थेट बायोबबलमध्ये प्रवेश करू शकतात. बीसीसीआयच्या या निर्णयाचा फायदा दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेत सहभागी झालेल्या खेळाडूंना होणार आहे.
आयपीएलसाठी एक डझन बायोबबल केंद्रे
आयपीएलसाठी एकूण बारा बायोबबल तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ हे सहभागी संघ व कर्मचाऱ्यांसाठी असतील. दोन बबल सामना अधिकारी आणि सामना व्यवस्थापन संघासाठी असतील. तर, दोन बबल प्रसारण समालोचकांसाठी असतील. बीसीसीआयचे अधिकारी, खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापन तसेच प्रक्षेपण पथकातील व्यक्ती यांनाही बायोबबलमध्ये राहावे लागणार असून त्यांना कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी संपर्क करता येणार नाही.