शार्दुलच्या सरावावर बीसीसीआयचा संताप

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप भारतीय संघातील तसेच संभाव्य क्रिकेटपटूंना सरावाची परवानगी दिलेली नाही. त्यातच संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने वैयक्तिक सरावाला प्रारंभ केल्याने बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता तसेच परवानगी न घेता त्याने सराव केल्याने आता बीसीसीआय काय निर्णय घेणार ते येत्या मंगळवारपर्यंत जाहीर होणार आहे.

शार्दुल पालघरमध्ये राहतो. तेथील तालुका क्रीडा संघटनेच्या मैदानावर त्याने सरावाला शनिवारपासून प्रारंभ केला. त्याच्यासह मुंबई संघातील खेळाडू व यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेदेखील सहभागी झाला होता. सोशल डिस्टंन्सिगचे जरी त्यांनी पालन केले असले तरी बीसीसीआयची परवानगी घेण्याचा साधा संकेतही त्याने पाळला नसल्याने तो अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

या दोघांना गोलंदाजी करण्यासाठी स्थानिक खेळाडूदेखील काही काळ सहभागी झाले होते. तसेच शार्दुल गोलंदाजीचा सराव करताना स्थानिक फलंदाजांनी नेटमध्ये सराव केला. गोलंदाजीचा सराव करताना प्रत्येकाने वेगळा चेंडू वापरला होता. तसेच क्रिकेटच्या सरावासाठी आवश्‍यक असलेले सर्व साहित्य सॅनिटाईज करण्यात आले होते. तसेच या सराव सत्रात सहभागी झालेल्या शार्दुलसह सर्व खेळाडूंचे थर्मल स्कॅनिंग देखील करण्यात आले होते.

करोनाचा धोका अद्याप कायम असूनही सरकारने देशातील जे भाग रेड झोनमध्ये नाहीत तिथे क्रीडा संकुले तसेच मैदाने सराव व प्रशिक्षणासाठी सुरु करण्याची परवानगी दिली असल्याने बीसीसीआय देखील येत्या काळात सराव सत्र आयोजित करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नसताना शार्दुलने स्वतः निर्णय घेत सराव केल्याने त्याच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंमध्ये शार्दुलचा क गटात समावेश आहे त्यामुळे त्याने वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी त्याची विचारणा करायला हवी होती असे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले.

बीसीसीआय येत्या आठवड्यात संघातील खेळाडूंच्या सरावाबाबत निर्णय घेणार आहे. त्यातच हा सराव चार टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यात जे खेळाडू सहभागी होतील त्यांना सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागेल. सोशल डिस्टंन्सिग, जिथे आवश्‍यक तिथे मास्कचा वापर, प्रत्येकाला स्वतंत्र चेंडू, संपूर्ण क्रिकेट कीटचे निर्जंतुकीकरण, एकमेकांशी हस्तांदोल न करणे अशा स्वरुपाची काळजी घेत सराव सुरु केला जाणार आहे. अर्थात त्याचबरोबर हा सराव पाहण्यासाठी प्रेक्षकांना मनाई असेल तसेच मंडळाशी तसेच स्थानिक संघटनांशी संबंधित व्यक्तींनाच प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांच्यासह प्रवेश देण्यात येणार आहे. माध्यमांचे प्रतिनिधी व फोटो ग्राफर यांनाही ठरावीक वेळेतच सरावाचे वार्तांकन करण्याची परवानगी देण्यात येईल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

रोहितसाठी चाचणी बंधनकारक…

बीसीसीआयने सराव सत्र सुरु केले तरी त्यात हिटमॅन रोहित शर्मा याला थेट सहभागी होता येणार नाही. त्यापूर्वी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाऊन तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे. फेब्रुवारीअखेर न्यूझीलंड दौऱ्यावरुन रोहित दुखापतीमुळे मायदेशी परतला होता. आता त्याला सराव सत्रात सहभागी व्हायचे असेल तर चाचणी द्यावीच लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.