बीसीसीआयचा हट्ट : आयपीएल होणारच!!!

कर्फ्यूचा संघांच्या प्रवासावर परिणाम नाही?

मुंबई – वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन, कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आगामी आयपीएलच्या हंगामावर कोणते पडसाद उमटणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आठवड्याच्या शेवटी कडक निर्बंध लावल्यामुळे आयपीएलमधील मुंबईतील संघ हॉटेल ते वानखेडे स्टेडियमपर्यंत कसे प्रवास करणार यासंबंधी शंका निर्माण झाली होती. मात्र, या सामन्यांच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एएनआयशी बोलताना या अधिकाऱ्याने सांगितले, संघ जैव सुरक्षित वातावरणात आहेत. ते बसने प्रवास करणार आहेत, हा एक बायो बबलचाच भाग आहे. त्यामुळे कोणतेही संकट येणार नाही.

आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिल ते 30 मे यादरम्यान रंगणार आहे. लीगचा उद्घाटनाचा सामना 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये चेन्नईत रंगणार आहे तर 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज व दिल्ली कॅपिटल्स मुंबईच्या वानखेडेवर आमने-सामने असतील.

मात्र, राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन लागू केला असला, तरी संपूर्ण राज्यात सर्वकाळासाठी जमावबंदी आदेश लागू आहेतच. अकरा क्रिकेटपटू एकाच बसने हॉटेल ते मैदानापर्यंतचा प्रवास करतात. तसेच मैदानावर सुरक्षा रक्षक, दोन्ही संघांतील 16-16 खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंचांचे पॅनल, समालोचक, 10-12 कॅमेरामन, अन्य कर्मचारी, खानपान व्यवस्थेतील कर्मचारी अशी मोठीच फौज असते. मग जमावबंदी आदेशाचे पालन कसे होणार, असे अनेक प्रश्‍न सोशल मिडीयातून उपस्थित केले जात आहेत.

बीसीसीआयला पैशांपुढे सर्वसामान्यांचे आरोग्य दिसत नसल्याची टिका होत असून अनेकांनी बीसीसीआयच्या या आपमतलबी धोरणावर कडक ताशेरे ओढले आहेत. अशातच आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.