पुणे – बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल २८ आॅगस्टला जाहीर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर तीन प्रवेश फेरीतून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे यावर्षी बीबीए, बीसीए प्रवेशासाठी आणखी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस, बीबीए), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. मात्र बऱ्याच उमेदवारांना ही परीक्षा देता न आल्याने पुरवणी परीक्षा घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा अर्ज मागवून ही परीक्षा दि. ४ अ ाॅगस्टला घेण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना सीईटीची संधी मिळाली, पण प्रत्यक्ष प्रवेशा कधी सुरु केले जाणार आहे, अशी विचारणा पालकांकडून होत आहे.
दरम्यान, आतापर्यंत बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होत होती. मात्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेऊन या अभ्यासक्रमांसाठी मान्यता बंधनकारक केली. त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सीईटी सेलतर्फे दोन टप्प्यात सीईटी घेण्यात आली.
राज्य सीईटी सेलने बीबीए, बीसीए प्रवेशाचे तात्पुरती कार्यसूची प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दि. ४ आॅगस्ट रोजी झालेल्या सीईटीचा निकाल २८ आॅगस्टला जाहीर केले जाणार आहे. दि. २९ आॅगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज मागवून घेतले जातील.
दि. ९ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि दि. १३ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यानंतर पहिली, दुसरी आणि तिसरी प्रवेश फेरीतून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. म्हणजेच ही सर्व प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यास आॅक्टोबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.