Bawankule on Harshvardhan Patil । भाजपचे इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मागच्या काही दिवसापासून सुरु आहेत. त्यातच काल पुण्यातील एका बैठकीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा समोरासमोर आले. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार गटात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वर्त्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
…तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही Bawankule on Harshvardhan Patil ।
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडी आणि शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते की, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. पक्ष कोणाला अडवणार नाही. त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, महायुतीमध्ये ज्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. मात्र, त्यांना थांबायचं नाही. शेवटी त्यांनी थांबावं, अशी आमची इच्छा आहे, आमची त्यांना विनंती आहे. मात्र, शेवटी त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा रोख हर्षवर्धन पाटील यांच्या दिशेने असल्याचे म्हटले जात आहे. शरद पवारांशी चर्चा केल्यामुळे हे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांच्यासाठीच असल्याच्या चर्चेने आणखी जोर धरला. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी यावर तात्काळ स्पष्टीकरण दिले. मी कोणाच्या, कोणी माझ्या संपर्कात नाही. महायुतीचे जागावाटपही झालेले नसल्याने इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य माझ्यासाठी नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले? Bawankule on Harshvardhan Patil ।
इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबतचा निर्णय घेतील. अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी माझा संपर्क झालेला नाही. मीदेखील कोणाच्या संपर्कात नाही. मात्र, मी निवडणूक लढवावी, यावर कार्यकर्ते ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एक बैठक झाली होती. त्यावेळी इंदापूरबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले होते. अजित पवार यांनीही त्याला मान्यता दिली होती. मी निवडणूक लढवावी, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.