मायावतींची राजकीय अस्तित्वाची लढाई

न्यूज वीक या अमेरिकी नियतकालिकाने 2007 मध्ये मायावतींना जगातील सर्वांत शक्‍तिशाली महिला राजकारण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले होते. त्यादरम्यान एका मुलाखतीमध्ये मायावती म्हणाल्या होत्या की, त्यांना प्रतिस्पर्धा आणि विजय दोन्हीही आवडतात. या एका वाक्‍यावरून मायावतींचे राजकीय धोरण, लक्ष्य आणि हेतू लक्षात येतात. मायावती चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. अशाच प्रकारे चार वेळा त्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारही राहिल्या आहेत. आजच्या राजकारणामध्ये सर्वांत अनुभवी आणि सर्वांत प्रदीर्घ कारकिर्द असणारी महिला राजकारणी म्हणून देशाच्या राजकीय इतिहासात त्यांची नोंद आहे.

मायावतींशिवाय आघाड्यांचे राजकारण अपूर्ण मानले जाते. उत्तर प्रदेशातील अथवा देशातील बहुतांश आघाडी सरकारे ही त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकारे स्थापन होऊ शकलेली नाहीत. नव्वदीच्या दशकात केंद्रात आघाड्यांच्या सरकारांचे पर्व सुरू झाले होते तेव्हा मायावती पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होत्या.

15 जानेवारी 1956 रोजी दिल्लीतील जाटव परिवारात जन्मलेल्या मायावती राजकारणात येण्यापूर्वी शिक्षिका होत्या. त्यादरम्यान त्या दलितांची प्रमुख कर्मचारी संघटना असणाऱ्या बामसेफशी जोडल्या गेल्या. त्यावेळी दलित नेते काशीराम यांनी मायावतींच्या कार्याची दखल घेतली आणि 1984 मध्ये त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्याच वर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष बनले कांशीराम आणि मायावती महासचिव बनल्या. 2003 मध्ये कांशीराम आजारी पडल्यानंतर मायावतींनी पक्षाची कमान आपल्या हातात घेतली. तेव्हापासून त्या बसपाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. 2006 मध्ये काशीराम यांचे निधन झाल्यानंतर मायावतींचा एकछत्री पक्षावर अमल राहिला आहे.

सातत्याने सत्तेच्या राजकारणात राहून आणि कधी आमदार, तर कधी खासदार म्हणून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये सदस्य राहणाऱ्या मायावतींना कालौघात सत्तेचा कैफ चढला. त्यातूनच बसपाची पारंपरिक व्होटबॅंक असणाऱ्या घटकांकडे त्यांनी दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात पुढे येऊन बोलण्याबाबत मायावती नेहमी बचावात्मक भूमिकेत दिसू लागल्या. भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसेबाबत आणि दलित आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यांबाबत मायावतींनी योग्य प्रकारे भाष्य केले नाही, असा आरोप होतो. तसेच उत्तर प्रदेशात उदयाला आलेल्या भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांच्याशीही मायावतींनी नेहमीच अंतर ठेवले. त्यामुळे दलित समाजात निराशेचे वातावरण पसरले असल्याचे म्हटले जातें

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींसोबत आत्मियता ठेवणाऱ्या मायावतींनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी करण्यास नकार देऊन कॉंग्रेसला मोठा झटका दिला. त्यापाठोपाठ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षासोबत आघाडी करुन कॉंग्रेसला बाजूला सारण्यात मायावती यशस्वी झाल्या आहेत.

मधल्या काळात अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले, लव्ह जिहाद, गोरक्षेच्या मुद्द्यावरून झालेला हिंसाचार याबाबत मायावतींनी मौन बाळगणे पसंत केले किंवा उशिरा टिप्पणी केली. पण आता मायावतींचा नूर बदललेला दिसत आहे. ट्‌विटर अकाऊंट उघडल्यापासून त्या सक्रिय दिसत आहेत. पंतप्रधान मोदींवर सातत्याने त्या टीका करताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.