चीनी सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतील बत्ती गुल; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा

वॉशिंग्टन –  गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला निर्जन गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांत धूमशान उडाली होती. त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी तेथून दीड हजार मैलांवरील दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रेल्वे सेवा ठप्प झाली. शेअर बाजार बंद पडला. हॉस्पिटलला व्हेंटीलेटरला सुरू ठेवण्यासाठी जनरेटर सुरू करावी लागली. करोनाच्या साथीच्या काळात ही सर्वात भीषण घटना घडली होती. या दोन्ही गोष्टी परस्पर संबंध असल्याचे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

मुंबईमध्ये मागील वर्षी 12 ऑक्‍टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात आहे. भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे घडल्याचे स्पष्ट होत आहे. भारताने चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. देशभर वीजपुरवठा नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेवर या चीनी मालवेअरने हल्ला केला.

अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने याच भारत चीन संघर्षाच्या काळात मालवेअर इंजेक्‍ट केला. विशेष म्हणजे द न्यूयॉर्क टाइम्सने हा दावा आता केला असला तरी यापूर्वीही चिनी हॅकर्सचा मुंबईला काळोखात लोटण्यात हात होता, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध मॅस्स्युचेट येथील रेकॉर्डेड फ्युचर या 2009 मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्‍युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर ऍक्‍टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी होऊनही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवणारा प्रकार घडला. मात्र या भारताच्या उर्जा यंत्रणेत प्रवेश नसल्याने तसेच मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्‍शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आले. मात्र भारतीय प्रशासनाने त्यांनी काढलेले निष्कर्ष अद्याप जाहीर केले नाहीत.

महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्‍यता व्यक्त केली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. 12 ऑक्‍टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये अनेक तास वीज नव्हती. सकाळी दहा वाजल्यापासून पुढील अनेक तास अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

चिनी सरकार पुरस्कृत रेडइको नावाच्या कंपनीने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली, असे रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी असणाऱ्या स्टुअर्ट सोलेमॉन यांनी सांगितले.

वीज भार नियंत्रण केंद्रावर हा हल्ला करण्यात आल्याने काळजीची स्थिती निर्माण झाली होती. या बाबत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. त्याचा निश्‍कर्ष येत्या काही आठवड्यात येईल, असे भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. मात्र यातील चीनच्या सहभागाबद्दल भारतीय प्रसासन काहीही बोलण्यास तयार नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.

रेकॉर्डेड फ्युचरने प्रकाशित केलेल्या ब्लॉगमध्ये कंपनीने या सायबर हल्ल्यातील नोंदींचाही उल्लेख केलाय. च्या सुरुवातीपासून रेकॉर्डेड फ्युचरच्या इनस्कीट ग्रुपला भारतीय संस्थांशीसंबंधित यंत्रणांमध्ये चिनी सरकारचा पाठिंबा असणाऱ्या कंपन्यांकडून घुसखोरी होत असल्याचे संकेत मिळत होते. च्या मध्यामध्ये कंपनीला भारतातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करणारे काही मालवेअर सापडले.

वीजपुरठ्यातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करुन ठिकाणचे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय भारतामधील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही हल्ला करण्यात आल्याचे दिसून आले, असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. भविष्यातही आम्ही रेडइकोच्या हलचालींवर लक्ष ठेवणार असल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.