मुंबई – भारतीय संघाला इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सहा सामन्यांसाठी भारताचा स्टार बॅट्समन चेतेश्वर पुजाराने कसून सराव सुरू केला आहे.
दौऱ्याला जरी आणखी एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासून तयारी सुरू केली आहे. त्याच सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत व न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनदरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या अजिंक्यपदासाठी दोन्ही संघ करंडक जिंकण्यासाठी कसून सराव करत आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी पुजारा नेटमधील सरावात प्रचंड मेहनत घेत आहे. पुजारा जिममध्ये घाम गाळत असल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे.
रवींद्र जडेजाही सज्ज
मैदानात अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सज्ज होत असलेल्या रवींद्र जडेजानेही सराव सुरू केला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तो सराव करण्याबरोबरच जिममध्ये प्रचंड मेहनत घेत असल्याचेही दिसत आहे.
भारताला संधी
इंग्लंड दौऱ्यावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. अंतिम सामना जिंकून विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी आहे.