Batla House Encounter : बाटला हाऊस चकमक प्रकरणात अरिझ खान दोषी

नवी दिल्ली – दिल्लीत बाटला हाऊस येथे सन 2008 मध्ये झालेल्या चकमक प्रकरणात दिल्लीच्या अतिरीक्त सत्र न्यायाधिशांनी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अरिझ खान याला दोषी ठरवले आहे.

दिल्ली पोलिस दलातील पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. सरकारी पक्षाने त्याच्या विरोधात सादर केलेलेल्या पुराव्याच्या आधारे त्याच्यावरील आरोप साबीत होत असल्याचे निरीक्षण कोर्टाने नमूद केले असून या प्रकरणात खानला 15 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

या चकमकीत मारले गेलेले शर्मा हे दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलिस निरीक्षक होते. दिल्लीच्या जामीया नगर भागातील बाटला हाऊस इमारतीत झालेल्या चकमकीत तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

ट्रायल कोर्टाने याच प्रकरणात जुलै 2013 मध्ये इंडियन मुजाहिद संघटनेचा दहशतवादी शहजाद अहमद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याने आपल्या शिक्षेला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले असून त्याची सुनावणी तेथे प्रलंबीत आहे. या चकमकीनंतर अरिझ खान घटनास्थळावरून फरारी झाला होता. त्याला 14 फेब्रुवारीला अटक करून त्याच्यावर नव्याने हा खटला चालवण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.