पुणे – विद्यांचल संघाने शार्पशूटर्स “अ’ संघाचा 40-14 असा सहज पराभव करीत कुमारांच्या इंदिराबाई जोशी स्मृती जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटात अपराजित्व कायम राखले.
डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यांचल संघाने पूर्वार्धात 25-6 अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सानिका देशमुख व राजनंदिनी निंबाळकर यांनी कौतुकास्पद खेळ केला. शार्पशूटर्सच्या साक्षी भोईरचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंनी निराशा केली. मुलींच्या गटात क्रॉसओव्हर क्लबने टीझिरो क्लबचा 34-4 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याचे श्रेय सिद्धी शिंदे व झैनाब हबीबुला यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. पराभूत संघाच्या वैष्णवी गिरीने एकाकी लढत दिली.
मुलांच्या विभागात पूर्वार्धातील 16-21 अशी पिछाडी भरून काढीत मिलेनियम संघाने बिशप्स संघाला 35-33 असे हरविले. चुरशीने झालेल्या या लढतीत मिलेनियमकडून धृव सूर्यवंशी व आर्यन लिमये यांचा खेळ सुरेख झाला. बिशप्स संघाच्या वरूण तेर्ला व अनिष जयरथ यांचे प्रयत्न अपुरे ठरले. डेक्कन जिमखाना “ब’ संघाने मॉडर्न पास्ट असोसिएशनवर 56-28 असा विजय मिळविला. त्यावेळी त्यांच्याकडून आदित्य भालेराव व यश मोरे यांनी उल्लेखनीय खेळ केला. पराभूत संघाच्या कुशाग्र दत्ता व ईशान जाधव यांनी चिवट झुंज दिली.
स्पोर्टस एरिना संघाने विजयी वाटचाल कायम राखली. त्यांनी ऑल स्टार संघाचा 39-27 असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांच्याकडे 16-12 अशी आघाडी होती. त्यांच्या विजयात ऋषभकुमार व सनी पिसाळ यांचा मोठा वाटा होता. ऑल स्टार संघाच्या शिवनेश महाजन व अथर्व जोशी यांचे प्रयत्न अपुरे ठरले. ही स्पर्धा पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्लबने आयोजित केली आहे.