बंगळूर – कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी सत्तारूढ भाजपने मंगळवारी निश्चित केला. त्यानुसार, बसवराज बोम्मई हे त्या राज्याचे नवे मुख्यमंत्री ठरले आहेत.
बऱ्याच दिवसांपासून कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा होती. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याने सोमवारी त्याविषयीचा सस्पेन्स संपला. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.
त्या बैठकीत बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येडियुरप्पा यांचा पाठिंबा असल्याने बोम्मई यांची निवड सुकर झाल्याचे समजते. येडियुरप्पा मंत्रिमंडळात 61 वर्षीय बोम्मई गृह आणि कायदा या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत होते.
लिंगायत समाजातील नेते असणाऱ्या बोम्मई यांची स्वच्छ प्रतिमा त्यांची जमेची बाजू ठरली. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची कायम ओळख राहिली. बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने येडियुरप्पा अधिक दुखावणार नाहीत याची दक्षता घेतल्याचे मानले जात आहे.
नवा मुख्यमंत्री निवडताना कुठला पेच निर्माण होऊ नये यासाठी भाजपने धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी या केंद्रीय मंत्र्यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून कर्नाटकला पाठवले. त्यांच्या उपस्थितीत बोम्मई यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी निश्चित झाला.
मुख्यमंत्रिपद सांभाळणारी दुसरी पिता-पुत्र द्वयी
बसवराज बोम्मई यांचे वडील दिवंगत एस.आर.बोम्मई यांनीही याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्यामुळे ते पद सांभाळणारी दुसरी पिता-पुत्र द्वयी कर्नाटकला लाभली आहे. याआधी एच.डी.देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एच.डी.कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला.