पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (बार्टी) एमपीएससी स्पर्धा परीक्षा सीईटीच्या चाळणी परीक्षेत दुसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 1 सप्टेंबरला घेतली जाणार आहे.
बार्टीच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांकरिता मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. त्याकरिता विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी होऊ लागल्याने, विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता चाळणी परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार आगामी वर्षाकरिता बार्टी एमपीएससी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुण्यातील यूपीएससी ऍकॅडमी या संस्थेत प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता 10 ऑगस्टला होणारी चाळणी परीक्षा काही कारणामुळे 18 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे.