बार्शी – करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र करोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीशिवाय पर्याय नाही. मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून करोना उपचारासंदर्भात दिलासादायक बातमी आली आहे. यानुसार करोना रुग्णांवर आता ओपीडी बेस उपचार होणार आहेत.
बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांनी करोना संसर्ग झालेल्या चार रुग्णांवर केलेल्या प्रयोगाला यश आलं आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं समजतं.
प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज म्हणजेच मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे. या पद्धतीमुळे करोना विषाणूला लक्ष्य करणं शक्य होत आहे. तसेच शरिरात करोना विषाणूची होणार उत्पत्ती थांबवण्यात येते. हाच प्रयोग बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी यशस्वी केला आहे.
डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग करण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी अंधारे हॉस्पीटल येथील गंभीर रुग्णावर या पद्धतीने उपचार केले. त्याला यशही आले. एका डॉक्टरच्या ६५ वर्षीय आई आणि एका वकिलाच्या वडिलांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देऊन घरी पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांच्या शरिरातून करोना विषाणू नाहीसे झाले.