किरकोळ वाद वगळता कर्जतला मतदान शांततेत

कर्जत – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आज पाटेगाव व घुमरी या ठिकाणचे किरकोळ वाद वगळता शांततेत 71.34 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात प्रथमच वास्तव्यास बाहेर असलेल्या मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 353 मतदान केंद्रांवर आज शांततेत मतदान झाले. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आज 71.34 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काट्याची लढत झाली आहे. कारण भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा सामना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार रोहित पवार यांच्यात रंगला आहे. युतीचे उमेदवार राम शिंदे यांनी चोंडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी दिल्या व पाहणी केली व आढावा घेतला. समवेत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत होते. कुळधरण येथे बंडू कुलथे यांच्या निवासस्थानी राम शिंदे यांनी भेट दिली. समीर जगताप व इतरांनी स्वागत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार तसेच सुनंदा पवार, कुंतीताई पवार यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य श्‍याम कानगुडे, युवा नेते सचिन सोनमाळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी कोरेगाव येथे मतदान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड यांनी कुळधरण येथे मतदान केले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी आळसुंदे येथे मतदान केले. मागील दोन-तीन दिवस कर्जत तालुक्‍यातील सर्व भागात पावसाची संततधार सुरू होती. आज पावसाची चिंता सर्वांनाच लागली होती. मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली. त्यामुळे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. पाऊस नसल्याने मतदानाचा टक्का वाढला.

आंबीजळगाव येथील महिलांनी एकत्र येऊन वोटर स्लीप वाटप करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. याचा फायदा महिला मतदारांना मोठ्या प्रमाणात झाला. शारदा अनारसे, राजश्री जमदाडे, सारिका अनारसे, सुषमा यादव, रंजना अनारसे या महिलांनी येथील कामकाज पाहिले. आज मतदान सुरू असताना भांडेवाडी, कापरेवाडी, गायकरवाडी येथील मतदानयंत्रे काही काळ बंद पडली होती. पर्यायी मशिन यावेळी उपलब्ध करून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कर्जत तालुक्‍यातील पाटेगाव व घुमरी येथे स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. मात्र प्रशासन व स्थानिकांनी वेळेत लक्ष घालून वादावर पडदा टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.