पुणे – महापालिका “ट्रबल शूट’साठी खास हेल्पलाइन तयार करणार असून, यामध्ये लसीकरणात सुरूवातीपासून येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“तुमचे नियोजित लसीकरण रद्द झाले आहे’ असे मेसेज येणे, चुकीचे मेसेज जाणे, कोविन ऍपवर नोंदणी होण्यात अडचणी, ओटीपी न मिळणे, ओटीपी भरला तरी लसीकरणासाठी अपॉइंटमेंट न होणे, प्रमाणपत्र न मिळणे, “कोवॅक्सीन’ दिले तर “कोविशील्ड’ दिल्याचा मेसेज येणे या आणि यासंबंधी अनेक तक्रारी लसीकरणात येत आहेत. त्यामुळे अनेकजणांचा गोंधळ उडाला आहे. त्यातून “सिनियर सिटीझन्स’ना याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेने “हेल्पलाइन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे महापालिका हे सगळे तांत्रिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
शुक्रवारपासून ही “हेल्पलाइन’ कार्यरत असणार आहे. यासाठी सहाय्यक आरोग्य प्रमुख यांच्याकडे जबाबदारी दिली असून, त्यांना दोन ऑपरेटर देण्यात येणार आहेत. शुक्रवारीच हा हेल्पलाइन नंबर जाहीर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. या हेल्पलाइनमुळे लसीकरण मोहिमेला गती मिळेल असेही अग्रवाल यांनी नमूद केले.
संख्या वाढवण्यात येणार…
मागील वर्षीप्रमाणे गंभीर रुग्णांचे किंवा “हॉस्पिटलाइज्ड’ करावे लागतील असे रुग्ण सध्या नाहीत. बहुतांश रुग्ण हे लक्षणे नसलेले किंवा प्राथमिक लक्षणे असलेली आहेत. तसेच, बाधितांमधील मोठी संख्या “होम आयसोलेशन’मध्येच आहे. त्यामुळे अद्याप ऍम्ब्युलन्सच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण आली नाही. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ऍम्ब्युलन्ससाठी “वॉररूम’ तयार करत आहोत. तसेच रुग्णवाहिकांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
सध्या आमच्याकडे 54 रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून मागच्यावेळी जशा अधिग्रहित केल्या होत्या. त्यावेळी एकूण 125 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. तशा याहीवेळी करणार आहे. गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाढवणार आहोत. यामध्ये शववाहिन्यांचाही समावेश असल्याचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.