पुणे – रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यामध्ये आपल्या व्याजदरात कपात केलेली नाही. मात्र, काही अटीवर रोख राखीव प्रमाणात सवलती दिल्या आहेत. या आधारावर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.
स्टेट बॅंकेने गेल्या आठवड्यात कर्ज व ठेवीवरील व्याज दरात कपात केल्यानंतर बॅंक ऑफ बडोदाने आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर केली आहे. बडोदा बॅंकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार बॅंकेने आपला एमसीएलआर 0.10 टक्क्यांपर्यंत कमी केला. त्यामुळे बॅंक देत असलेल्या घर, वाहन आणि इतर कर्जावरील व्याजदरात नव्या कर्ज घेणाऱ्यासाठी घट होणार आहे.
बॅंकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता या बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.25 टक्क्यावरून 8.15 टक्के झाला आहे. या दराच्या आधारावर बहुतांश कर्जावरील व्याज दर ठरविले जातात. या निर्णयाची अंमलबजावणी 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे बॅंकेने पत्रकात म्हंटले आहे.
बॅंकेने एक महिन्यासाठीचा एमसीएलआर 0.05% कमी करून 7.55 टक्के केला आहे. त्याचबरोबर ओव्हर नाइट, तीन आणि सहा महिन्याचा एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे.