मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाने कारसाठीच्या कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अगोदर बडोदा बॅंकेचा कार साठीच्या कर्जावरील व्याजदर सात 7.25 टक्के होता, तो आता 7 टक्के करण्यात आला आहे.
त्याचबरोबर बॅंकेने स्पष्ट केले आहे की, 30 जून 2022 पर्यंत कारसाठी घेतलेल्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क कमी करून ते 1,500 रुपये अधिक जीएसटी करण्यात आले आहे. हा कमी केलेला कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया स्वरूपातील सवलत नवी कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. कर्ज घेणाऱ्यांचे पतमानांकन चांगले असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बॅंकेचे महाव्यवस्थापक एच टी सोळंके यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांना त्यांची आवडती कार खरेदी करता यावी याकरिता बॅंकेने पुढाकार घेऊन ही योजना सुरु केली आहे.
मात्र या योजनेचा सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी दुचाकी खरेदी करण्यासाठी कसलाही फायदा होणार नाही. त्यांना जुन्या दराने व्याज दर आकारण्यात येणार आहे. गेल्याच महिन्यामध्ये मर्यादित काळासाठी बडोदा बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याज दर 6.75 टक्के वरून 6.50 टक्के केला होता. मात्र ही सवलत फक्त 30 जून 2022 पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच सर्व कर्जावरील व्याजदर वाढणार असतांनाच मर्यादित काळासाठी कर्जाचा उठाव वाढावा याकरिता बडोदा बॅंकेने हा पुढाकार घेतला असल्याचे बोलले जाते.
मात्र एकूणच वातावरण व्याजदर वाढ होण्यासाठी पूरक आहे. काही बॅंकांनी काही कर्जावरील व्याजदरात अगोदरच वाढ केलेली आहे. त्याचबरोबर इतर सर्व बॅंकी लवकरच कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. जूनमध्ये होणाऱ्या रिझर्व बॅंकेच्या पतधोरणीत बॅंक आपल्या मुख्य व्याजदरात वाढ करण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. कारण रिझर्व बॅंकेने महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला असतानाही महागाईचा दर सध्या 7 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. किंबहुना रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच व्याजदरात वाढ करण्याची गरज होती अशी टीका होऊ लागली आहे.