भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बारणेंची सपशेल माघार

युतीतील वाद मिटला; “पिंपरी’ भाजपला सोडल्याची चर्चा

मनोमिलन झाले पण अटी अन्‌ शर्ती लागू

युतीसाठी पिंपरीचा बळी?
मावळ लोकसभा मतदारसंघात युतीत मनोमिलन व्हावे, यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची अट भाजपाकडून ठेवण्यात आली होती. ही अट मान्य करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पिंपरीत आता शिवसेनेचा आमदार असतानाही युतीसाठी या मतदारसंघाचा बळी देण्यात आल्याचे समजले. याशिवाय आमदार लक्ष्मण जगताप यांना निवडणुकीनंतर मंत्रीपदही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे मनोमिलन अटी आणि शर्तींवरच झाल्याचे समजते.

पिंपरी – तब्बल दहा वर्षांपासून सुरू असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे वादावर आज अखेर पडदा पडला. शिवसेना -भाजपा युतीमुळे हा वाद संपुष्टात आला असला तरी सार्वजनिक विकास कामांवरून बारणे यांनी केलेले सर्व आरोप मागे घेत सपशेल माघार घेतली. केंद्रात सत्ता आणण्यासाठी युतीमध्ये मनोमिलन झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी ही युती अटी आणि शर्तींवरच लागू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची राज्य पातळीवर युती झाली आहे. मावळ आणि शिरुर मतदारसंघातील वाद गेल्या अनेक दिवसांपासून कायम होता. आठ दिवसांपूर्वी शिरुरचा वाद संपुष्टात आला होता, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील तिढा कायम होता. जगताप आणि बारणे यांच्यातील राजकीय वितुष्टामुळे वाद टोकाला गेला होता. राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी मनधरणी करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही “मनोमिलन’ काही केल्याने होत नव्हते. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती.

मात्र काल (रविवारी) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या वादावर तोडगा काढण्यात आला आणि मनोमिलन झाल्याचे आज पत्रकार परिषद घेवून जाहीर करण्यात आले. आज (सोमवारी) पिंपरीतील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, भाजपच्या प्रदेश नेत्या उमा खापरे, प्रदेश सदस्य अमित गोरखे, भाजपचे ज्येष्ठ नेते अमर मुलचंदानी, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, भाजप सरचिटणीस सांरग कामतेकर, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले, आमच्यातील वाद संपुष्टात आले असून देशाच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत. तर बारणे बोलताना म्हणाले, मी आतापर्यंत केलेले आरोप हे राजकीय हेतूने केले होते, ते सर्व आरोप मी मागे घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच देशाला अधिक बळकट बनविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.